Pune Media
Leading the news curation and publishing for the people of Pune

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल समाधान

नवी दिल्ली, दि. ०६ : मुंबईतील इंदू मिल या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले. गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे या पुतळ्याच्या प्रतिकृतीचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील सदस्य, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, माजी मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांचा गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी करून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. तसेच, काही किरकोळ बदल सुचविले. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, असा राज्य शासनाचा मानस आहे. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यास राज्य शासन कटिबद्ध असून बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकाचे खास वैशिष्ट्य आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्याकडून गाझियाबाद येथे या पुतळ्याची २५ फुटांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येणार आहे. यावेळी श्री.सुतार यांनी उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याबद्दलचे  सादरीकरण केले.

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित दौऱ्यामध्ये भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, विधानसभा सदस्य संजय बनसोडे, यामिनी जाधव, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, डॉ. राजेंद्र गवई, जयदीप कवाडे, भदंत राहुल बोधी यांसह सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सदस्य, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, सर ज.जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी येथे आयोजित बैठकीतील चर्चेत सहभागी होऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीविषयी समाधान व्यक्त केले.

देश-विदेशातील डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी या स्मारकाला भेट देवून त्यांच्या भव्य पुतळ्यापासून प्रेरणा घेतील, अशी भावना सर्वांनी यावेळी व्यक्त केल्या.

०००

Tags: इंदू मिलसामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री



प्रतिमा केवळ संदर्भासाठी आहेत. Google किंवा तृतीय पक्ष स्त्रोतांकडून स्वयंचलितपणे एकत्रित केलेल्या प्रतिमा आणि सामग्री. प्रतिमा आणि सामग्रीवरील सर्व हक्क त्यांच्या कायदेशीर मूळ मालकांकडे आहेत.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More