Pune.Media

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी


बारामती, दि. 17:- बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला, या पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भिगवण रस्त्यावरील अमरदिप हॉटेल, तांदुळवाडी भागातील वृध्दाश्रम, पंपहाऊस येथील चांदगुडे वस्ती, कऱ्हा नदीवरील खंडोबानगर येथील पूल, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पाहणी केली.

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. पुढील काळात पूरस्थिती टाळण्यासाठी नदीचे खोलीकरण करणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण हटविणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पूररेषेच्या आत अतिक्रमणे होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज-अंजनगाव येथील बंधाऱ्याजवळील पुलाचा भराव खचला आहे. तसेच बारामती-फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील रस्त्याचा भराव खचला असून या दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणची दुरुस्तीची कामे तातडीने करुन याठिकाणची वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना उपमख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, नगरसेवक सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

Comments
Loading...
Do NOT follow this link or you will be banned from the site!