Pune Media
Leading the news curation and publishing for the people of Pune

कौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

पुणे, दि. १० : भारतात कौशल्यांना सर्वाधिक वाव असून देशाला कौशल्य राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील सॉफ्टवेअर अभियंते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, कुशल कामगार जगात भारताचे नाव मोठे करतात. त्यांना भारती विद्यापीठासारख्या संस्था कौशल्य प्रदान करत असल्यामुळे ते यशस्वी होतात, असे गौरवोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काढले.

भारती विद्यापीठाच्या ५९ वा वर्धापन दिन समारंभ आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भूमीपूजन समारंभात श्री. नार्वेकर बोलत होते. कार्यक्रमास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भारती विद्यापीठाचे  कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.

जो वाचायला शिकवतो तो देश घडवतो, असे सांगून श्री. नार्वेकर म्हणाले, भारती विद्यापीठ केवळ शैक्षणिक संस्था नसून देशात महाराष्ट्राची ओळख म्हणून ओळखले जाते. डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ आदी अनेक मान्यवर व्यक्तीमत्त्वे विद्यापीठाने घडवली आहेत. देशाला उंची प्राप्त करुन देण्यात भारती विद्यापीठसारख्या संस्था आणि संघटनांचा खूप मोठा हातभार आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनली आहे. त्यामध्ये अशा संस्थांनी शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाचा वाटा आहे.

श्री. नार्वेकर पुढे म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांनी गतीमान आणि प्रगतीशील शिक्षणातून समाजपरिवर्तन कसे करावे या संकल्पनेतून लावलेले रोपटे आज विद्यापीठाच्या रुपात विशाल वृक्ष म्हणून देशातील, जगातील अनेक विद्यार्थ्यांना सावली देण्याचे काम करत आहे. विद्यापीठाने आपली ख्याती आणि कार्य  केवळ पश्चिम महाराष्र्ट्र, पुण्यात नव्हे तर राज्यातील कानाकोपऱ्यात तसेच दिल्लीसारख्या राज्यात पोहोचवले आहे.

भारती विद्यापीठाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री. गेहलोत म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांचे विद्यापीठाचे स्वप्न त्यांच्या कष्टातून साकार झाले आहे. कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम शिक्षण आणि आरोग्यातून बनते. स्त्री शिक्षणासाठी पुण्यातून ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काम केले. राजस्थानात पूर्वी केवळ शासकीय शाळा होत्या. परंतु, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील खासगी शिक्षण संस्थांचा शैक्षणिक विकासातील योगदान पाहून राजस्थानात खासगी संस्थांना शिक्षण क्षेत्र खुले केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. विश्वजीत कदम म्हणाले,  डॉ. पतंगराव कदम यांनी सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी एका जिद्दीतून भारती विद्यापीठाची स्थापना केली. आज अनेक विद्याशाखा भारती विद्यापीठ संपूर्ण देशात चालवत आहेत. विद्यापीठाने संशोधनावर खूप लक्ष केंद्रीत केले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाकडून काम सुरू आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या ध्येयानुसार केवळ पदवीधर बनविणे नव्हे तर चांगला माणूस घडविण्याचे काम विद्यापीठाकडून चालते. महाराष्ट्र आणि देशाची सेवा करणारे विकासात योगदान देऊ शकतील असे युवा घडविण्याचे काम येथे चालते, असेही डॉ. कदम म्हणाले.

यावेळी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील यांना मानपत्र प्रदान करुन सन्मान करण्यात आला.

प्रारंभी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

‘विचार भारती’ या मुखपत्राच्या विशेषांकाचे आणि ‘विश्वभारती’ या इंग्रजी बुलेटिनचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पतंगराव कदम सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

000

Tags: भारती विद्यापीठ



प्रतिमा केवळ संदर्भासाठी आहेत. Google किंवा तृतीय पक्ष स्त्रोतांकडून स्वयंचलितपणे एकत्रित केलेल्या प्रतिमा आणि सामग्री. प्रतिमा आणि सामग्रीवरील सर्व हक्क त्यांच्या कायदेशीर मूळ मालकांकडे आहेत.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More