Our Terms & Conditions | Our Privacy Policy
फिनिक्स मॉल – वाघोली दरम्यान एकात्मिक उड्डाणपूल़, मेट्रोसाठी डीपीआर करा
पुणे, दि. २१: नगर रस्त्यावर फिनिक्स मॉल ते खराडी – वोघोली, सोलापूर रस्त्यावर भैरोबानाला ते लोणी काळभोर या मार्गावर उन्नत मार्ग उड्डाणपूल व त्यावर मेट्रोसाठी तरतूद अशा पद्धतीच्या रस्त्यासाठी व्यवहार्यता तपासणी व विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
रस्ते व मेट्रोच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, पुणे महानगर पालिकेचे माजी नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते.
पुणे मेट्रोद्वारे मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम अंतर्गत नगर रोड वरील खराडी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उड्डाणपुलाशी जोडणीबाबत श्री. हर्डीकर यांनी सादरीकरण केले. टप्पा-२ साठी हा विस्तृत प्रस्ताव अहवाल केला असून नगर विकास विभागाकडे पाठविला आहे, असे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही गतीने करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
मेट्रोच्या खडकवासला ते स्वारगेटचा प्रकल्प अहवाल करण्यात आला असून स्वारगेट ते लोणी काळभोरपर्यंतचा प्रकल्प अहवाल करण्यात यावा. हे करत असताना सोलापूर रस्त्यावर भैरोबा नाला ते लोणी कालभोरपर्यंत एकात्मिक रस्ते, उड्डाणपूल व त्यावर मेट्रोसाठी तरतूद करावी लागेल. सोलापूर मार्गावरील मोठी वाहनसंख्या पाहता लोणी काळभोर ते उरुळी कांचन या दरम्यानही भविष्यात मेट्रोचा विचार करावा लागेल असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
नगर मार्गावर वाघोली, खराडी आदी परिसरात प्रचंड लोकसंख्या वाढली असून त्यामुळे रहदारी प्रचंड वाढली असून केवळ वाघोली ते खराडी नव्हे तर फिनिक्स मॉलपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान विचारात घेऊन डीपीआर करावा लागेल, याबाबत एनएचएआय, पुणे महानगरपालिका आणि महामेट्रोने समन्वयाने काम करावे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
श्री. हर्डीकर यांनी मेट्रो कामांबाबत माहिती दिली. वनाझ ते रामवाडीपर्यंत ची पूर्ण मेट्रो मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण व कार्यान्वित होण्याचे प्रस्तावित आहे. यावरील स्थानकांना पीएमपीएमएल बसेसची चांगली जोडणी झाल्यानंतर मोठी प्रवासी संख्या मेट्रोकडे वळेल, असेही त्यांनी सांगितले.
०००
Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their legal original owners.