Our Terms & Conditions | Our Privacy Policy
महाष्ट्रातील ७ कलावंताना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 16 : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 84 कलाकारांना विशेष एक-वेळ पुरस्काराने उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून यात महाराष्ट्रातील सात कलावंताचा समावेश आहे.
ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणताही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही, अशा कलाकारांना हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत 75 वर्षांवरील 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले. या दिग्गज कलाकारांमध्ये 70 पुरुष आणि 14 महिला उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वात वयस्क मणिपूरचे 101 वर्षांचे युम्नाम जत्रा सिंग आहेत. या यादीत गौरी कुप्पुस्वामी आणि महाभाष्याम चित्तरंजन या दोन महिला कलाकारांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.
लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सतारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथ्थकसाठी चरण गिरधर चाँद व डॉ. पद्मजा शर्मा, संगीतासाठी उस्ताद उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या मान्यवरांचा कला क्षेत्रातील योगदानासाठी आज संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले.
येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रापती, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री श्रीमती मिनाक्षी लेखी, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा उपस्थित होत्या. ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
-पुरस्कार विजेत्यांबाबतची माहिती-
डॉ. प्रभाकर भानुदास मांडे
श्री प्रभाकर भानुदास मांडे यांना त्यांच्या मराठी लोककलातील विद्वत्तेबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रभाकर भानुदास मांडे हे लोककथा, लोकसंस्कृती आणि साहित्याचे ज्येष्ठ संशोधन अभ्यासक आहेत. त्यांनी 17 वर्ष मराठवाडा विद्यापीठात रीडर म्हणून काम केल्यानंतर 1993 मध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. गांवगड्या बाहेर, रामकथेची मौखिक परंपरा, लोक रंगभूमी, मागणी त्याचे मांगते, सहित अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या विविध प्रकाशनातून त्यांनी प्रचलित ज्ञान आणि कलेचे लपलेले पैलू शहरी लोकांसमोर आणले आहेत आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर स्तरावरील या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.
डॉ. पद्मजा शर्मा
कथ्थक नृत्यातील योगदानाबद्दल डॉ. पद्मा शर्मा यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती पद्मा शर्मा यांनी 1959 मध्ये भातखंडे महाविद्यालयातून कथ्थकमधील नृत्य निपुराण ही पदवी मिळवली होती. त्यांनी मुंबईतील ललित कला एज्युकेशन ट्रस्टमध्ये नृत्य शिक्षक आणि कोरिओग्राफर म्हणूनही काम केले आहे. त्या वल्लभ संगीत विद्यालय, मुंबईच्या नृत्य विभागाच्या प्रमुख म्हणूनही काम केले आहे.
शंकर कृष्णाजी अभ्यंकर
श्री शंकर कृष्णाजी अभ्यंकर यांना हिंदुस्थानी वाद्य संगीत सितारमधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री शंकर कृष्णाजी अभ्यंकर यांचा जन्म 1934 साली महाराष्ट्रातील सातारा येथे झाला, त्यांनी गांधर्व महाविद्यालय मंडळ सतार वादनात अलंकार ही पदवी मिळवली. त्यांचा संबंध ग्वाल्हेर घराण्याशी असून त्यांनी कुमार गंधर्व यांच्याकडून बंदिश आणि रचनेचे प्रशिक्षण घेतले आणि पंडित रविशंकर यांच्याकडून सतार वादनाचे प्रशिक्षण घेतले.
भिकल्या लडक्या धिंडा
महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातून भिकल्या लडक्या धिंडा, हे उत्कृष्ट तारपावादक म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या वडिलांकडून मिळालेली ही कला त्यांनी तारपाची निर्मिती आणि वादन या दोन्ही कार्यांतून जोपासली. अनेक युवकांना ते वादनाचे धडे देतात. जवळपास दहा फूट लांबीचा तारपा हे धांडा यांचे वैशिष्ट्य. भिकल्या धिंडा यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी तारपावादनाने रसिकांना मोहवले आहे. ते स्वतः तारपा वाद्याची निर्मिती करून चरितार्थ करतात. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी अवघे आयुष्य वेचणारे धिंडा यांच्यावर अमृत पुरस्काराने गौरव झाला.
हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर
महाराष्ट्राच्या लोकरंगभूमीतील (खादी गंमत) योगदानाबद्दल श्री हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 1946 रोजी जन्मलेल्या श्री. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर यांनी विदर्भातील खडी गंमत, डडार आणि दहाका या जुन्या पारंपरिक लोकनाट्यांचे पुनरुज्जीवन करून, नव्या पिढीपर्यंत नेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. श्री बोरकर यांना सांस्कृतिक मंत्रालयाची वरिष्ठ फेलोशिपही मिळाली आहे.
चरण गिरधर चाँद
श्री चरण गिरधर चाँद यांनी त्यांचे वडील नारायण प्रसाद यांच्याकडून कथ्थक नृत्याचे प्रारंभिक प्रशिक्षण घेतले. तसेच गायन आणि हार्मोनियम, तबला, पखावाज, नाळ आणि इतर वाद्ये शिकली. कथ्थक नृत्याच्या प्रचारासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कार्यशाळा आणि व्याख्याने-प्रात्यक्षिके मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली आहेत. कथ्थक नृत्यातील योगदानाबद्दल श्री चरण गिरधर चाँद यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
उस्मान अब्दुल करीम खान
श्री उस्मान अब्दुल करीम खान यांना हिंदुस्थानी वाद्य संगीत – सतारमधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील श्री उस्मान अब्दुल करीम खान हे संगीतकारांच्या घराण्यातील आहेत. ते सहाव्या पिढीतील संगीतकार आणि तिसऱ्या पिढीतील शास्त्रीय सितार वादक आहेत. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी सतार वादन शिकायला सुरुवात केली. 1985 मध्ये पॅरिसमध्ये 24 तासांचे राग सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये सितार वादक म्हणूनही त्यांनी भाग घेतला होता. 1988 मध्ये, त्याच शहरात 9 तासांच्या संपूर्ण रात्र त्यांनी मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. ललित कला मंदिर, मलेशियाच्या हिंदुस्थानी संगीताचे आंतरराष्ट्रीय डीन म्हणून त्यांचे नामांकन करण्यात आले असून, त्यांना ‘सतार नाद योगी’ ही पदवी देखील बहाल करण्यात आली आहे.
0000
अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 172, दि.16.09.2023
Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their legal original owners.