Pune.Media

रोहयोसाठी जॉब कार्ड नोंदविण्याची मोहीम शासनाची यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांनी सहकार्याने राबवावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


मुंबई, दि.१५ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे सध्या कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणेने समन्वयाने करुन समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

 

रोजगार हमी योजनेसंदर्भात विविध विषयांवर दूरदृश्यव्दारे आयोजित वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी रोजगार हमी योजना प्रधान सचिव नंदकुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, रोजगार हमी योजनेचे आयुक्त श्री.नायक यांच्यासह राज्यातील विविध भागातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी रमेश भिसे, किशोर मोघे, अरुण शिवकर,  सीमा कुलकर्णी,  शुभदा देशमुख,  संतोष राऊत,  कुशावती बेळे,  चंद्रकला भार्गव आदी उपस्थित होते. उपसभापती यांनी आयोजित केलेली ही रोहयो विभागासोबतची तिसरी बैठक आहे. पेण तालुक्यात १०७ शेततळी करण्यात आली असुन ३००० महिला मजुरांना संघटित करुन काम मिळवून देण्यात यश आल्याचे अरुण शिवकर यांनी सांगितले

 

श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या,ग्रामीण भागात महिला मजुरांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील कामेही उपलब्ध आहेत. परंतु जाणीवजागृतीचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे राज्यात जॉब कार्ड नोंदणी अभियान पंधरवडा कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ग्रामीण भागातील मजुरांना विविध फॉर्म कसे भरावे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणकोणती काम करता येतात. सार्वजनिक कामे कोणती,वैयक्तिक कामे कोणकोणती आहेत आदीसंदर्भात माहिती या जाणिवजागृतीमध्ये करण्यात येणार आहेत. महिला मजूरांना या विषयी माहिती करून देणे गरजेचे आहे, म्हणून त्यांना सविस्तर माहिती दिली जाईल, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

 

यापुर्वी पावसाळ्यात राज्यातील काही भागात पूर परिस्थिती गंभीर झाली होती. त्याठिकाणी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेती दुरुस्ती आणि गाव स्वच्छतेची कामे करण्यात आली होती. याहीवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. पूर परिस्थितीही निर्माण झाली. त्यामुळे याहीवर्षी रोहयोच्या माध्यमातून अशी अंतर्गत दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने पुन्हा रोहयो अंतर्गत कामे करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाबरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, रोजगार हमी योजना मंत्री यांना या सर्व संकल्पनेबाबत पाठपुरावा करणार असल्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

 

ज्या भागात मजुरांना जॉब कार्ड देण्यासाठी अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही, त्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल. ज्या ठिकाणी कामांची चौकशी सुरू आहे. तेथील पुढील कामे सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

 

रोहयोचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी राज्य आणि राज्यातील शेतकरी समृद्ध करण्यासाठी रोहयो अंतर्गत येणारे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासह ग्रामीण भागातील नागरिकांना मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले. कृषी विभागाचे  सचिव श्री. डवले यांनी कृषी विभागाअंतर्गत रोहयोच्या राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. रोहयोचे आयुक्त श्री.रंगा नायक यांनी बैठकीतील सूचनांवर पूर्णपणे कार्यवाही केली जाईल असे सांगितले. रोहयोतून ऑक्टोबर २० मध्ये  २० लाख मजुरांना तर एकुण  ७५५ कोटी रुपयांच्या कामांना मजुरी  देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

Comments
Loading...
Do NOT follow this link or you will be banned from the site!