Pune Media
Leading the news curation and publishing for the people of Pune

शासन आपल्या दारी : ‘योजना कल्याणकारी’

जनकल्याणाच्या अनेक योजना शासन राबवित असते. मात्र योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन जमा करणे, त्यातील त्रुटी दूर करणे, योजनेचा लाभ मिळवणे अशी विविध कार्ये पार पाडावी लागतात. काही वेळा नागरिकांना योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यत पोहोचत नाही. पर्यायाने योजनांचा उद्देश सफल होत नाही.

 हे टाळण्यासाठी आणि नागरिकांना मोठया प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी दारी’ हा लोकाभिमूख उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना मिळालेल्या लाभांची ही थोडक्यात माहिती.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे प्रत्येक जिल्हयामध्ये किमान पंच्याहत्तर हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली थेट लाभ देण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. जनतेला २०० हून अधिक योजनांचा लाभ देतानाच कमीतकमी कागदपत्रे आणि लाभास जलद मंजुरी दिली जाते. शासकीय योजनांची माहिती पहिल्यांदाच ‘हर घर दस्तक’ च्या माध्यमातून दिली जात आहे. प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत या उपक्रमाचे राज्यस्तरीय समन्वयन केले जाते. मंत्रालयस्तरावर सर्व प्रशासकीय विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना यामध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरील मुख्य कार्यक्रमापूर्वी तालुकास्तरावरही विविध मेळावे घेऊन नागरिकांना योजनांचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे.

विविध शासकीय विभागांच्या योजना, रोजगार मेळावा, महाआरोग्य शिबीर, रक्तदान व अवयवदान शिबीर, चष्मे वाटप, दिव्यांगांना साहित्य वाटप, शिक्षण हक्क कायद्यांगतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रवेश, कृषी प्रदर्शन, महिलांना ‘सखी किट’ वाटप, स्वयं रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट बाजार आणि बचतगटांचे स्टॉल, विविध सरकारी विभाग व महामंडळांच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल, सामाजिक उत्तरदायित्व योजनेंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ देणे, नवमतदार नोंदणी करणे व इतर लोकाभिमुख योजनांचा लाभ या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना देण्यात येतो. जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या धर्तीवर स्थानिक प्रशासनाच्यावतीने अशाप्रकारचा उपक्रम तालुकास्तरावर आयोजित करण्यात येतो. या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील दौलत नगर (मरळी) येथे स्वत: मुख्यमंत्री यांच्या हस्ते 13 मे रोजी झाला.

शासन जनतेच्या दारापर्यत

शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोचवून त्याचे जीवन सुखकर करण्याचे शासनाचे ध्येय आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होत असून, हा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा, अशी प्रतिक्रिया लाभार्थी व्यक्त करत आहेत. शासकीय यंत्रणा या उपक्रमामुळे सक्रिय झाल्याने ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ ही परिस्थिती बदलत असल्याचा नागरिकांना अनुभव येत आहे. शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासन नागरिकांच्या घरापर्यत पोहोचले असून योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सहज उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एका प्रकारे हसू फुलले आहे. याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा जागर होत आहे. अभियानातील लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. प्रशासन गाव-खेडयांत जाऊन जनतेच्या घरापर्यत पोहोचले आहे. त्यामुळे आगामी काळात सुमारे 7 ते 8 कोटी जनतेला याचा निश्चित फायदा होणार आहे असा विश्वास आहे.

पुणे-सातारा

पुणे विभागात सातारा जिल्हयात सुमारे 2 लाख 85 हजार लाभार्थ्यांना सुमारे 669 कोटी रुपयांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हयात जेजुरी येथे आयोजित या उपक्रमात जवळपास 23 लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. लाभार्थ्यांना सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. राज्यात नाशिक, पुणे, पालघर, अहमदनगर जिल्हयातील शिर्डी, परभणी, बुलडाणा येथे आतापर्यत जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या महत्वाकांक्षी उपक्रमाद्वारे आतापर्यत सुमारे दीड कोटी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. राज्य शासन, शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सहभागातून शासकीय योजना यशस्वी होते. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे ते महाराष्ट्राने देशाला दाखवून दिले आहे.

जयंत कर्पे,

सहायक संचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय, पुणे Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their legal original owners.

Aggregated From – Team DGIPR
Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More