Pune Media
Leading the news curation and publishing for the people of Pune

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर, दि. 4 (जि. मा. का.) : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी वीजेचे सर्व फिडर सौरउर्जेवर आणणार आहे. यातून चार हजार मेगावॅट वीजेचे उद्दिष्ट ठेवले असून यातून येत्या काळात शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

बार्शी येथे विविध विकास कामांच्या ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, राणा जगजितसिंह पाटील, सुरेश धस, माजी आमदार प्रशांत परिचारक आदींसह नगरपालिकेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी श्री. चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असून शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी शक्ती द्यावी, अशी मागणी भगवंताकडे केली आहे. सोलर फिडरसाठी शेतकऱ्यांची जमीन हेक्टरी ७५ हजार रूपये भाड्याने घेणार असून यातून शेतकऱ्यांना शाश्वत भाडे मिळेल. याबरोबरच ३० वर्षांनी जमीन परत दिली जाईल. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडणार आहे. गेल्या तीन महिन्यात सात हजार कोटींची मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केली आहे. एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट पैसे आणि दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्वी ६५ मिली पावसाच्या अटीमध्ये बदल करून सातत्याने सात-आठ दिवस पाऊस पडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास मदत देण्याच्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यापोटी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना ८० कोटींची मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

इथल्या बाजार समितीच्या माध्यमातून मोठी व्यापारपेठ तयार झाली आहे. या तालुक्यावर आसपासचे शेतकरी अवलंबून असल्याने कडधान्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत आहे. याठिकाणी हॉस्पिटल, शिक्षणाच्या सोयी असल्याने विकासाच्या संधी आहेत. अमृत दोन अंतर्गत बार्शी शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी ३५० कोटींची योजना करू, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी भूयारी गटार योजना लोकार्पण, प्रधानमंत्री आवास योजना भूमीपूजन, नगरोत्थान योजनेचे उद्घाटन श्री. फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे पार पडले. बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी ७०० कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून येत्या तीन वर्षात ही योजना पूर्णत्वाला येईल, यामुळे १२ हजार २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जानेवारीपासून कामाला सुरूवात होणार असल्याने अवर्षणग्रस्त तालुका पूर्णपणे सिंचनाखाली येणार असल्याने बार्शी तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भुयारी गटार योजना ११२ कोटी, महाराष्ट्र नगरोत्थान योजना ९० कोटी, न्यायालय इमारत ७४ कोटी, रस्त्यांसाठी ३३४ कोटी, १७ साठवण तलाव, १८ बंधारे, जलजीवन योजनेंतर्गत ५६ गावांना ४३ कोटींचा निधी मंजूर.

आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रास्ताविकातून दुष्काळी तालुक्यासाठी जलसिंचन, पाणीपुरवठा योजना तसेच अन्य १४ मागण्याबाबत विचार करण्याची मागणी केली.

डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल सेंट्रल आयसीयू आणि ट्रामा सेंटरला भेट

तत्पूर्वी श्री. फडणवीस यांनी डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल सेंट्रल आयसीयू आणि ट्रामा सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली. न्यूरो सर्जरी आणि पॉली ट्रामा विभागाचे उद्घाटन केले. नफा न कमाविता रूग्णसेवेचे समाजोपयोगी काम हे हॉस्पिटल करीत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय यादव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी उपस्थित होते.

भगवंत मंदिर येथे दर्शन

श्री. फडणवीस यांनी आज बार्शी येथील ग्रामदैवत श्री भगवंतांचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, राणा जगजितसिंह पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष दादा बुहूक उपस्थित होते.

Tags: १२ तास वीजप्रतिमा केवळ संदर्भासाठी आहेत. Google किंवा तृतीय पक्ष स्त्रोतांकडून स्वयंचलितपणे एकत्रित केलेल्या प्रतिमा आणि सामग्री. प्रतिमा आणि सामग्रीवरील सर्व हक्क त्यांच्या कायदेशीर मूळ मालकांकडे आहेत.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More