Our Terms & Conditions | Our Privacy Policy
समर्पित भावनेने काम करून सामाजिक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्यावा
सोलापूर, दि.8 (जिमाका):- प्रत्येक व्यक्तीने समाजात वावरत असताना या समाजाप्रती काही देणे आहे अशी समर्पित भावना ठेवून सामाजिक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित शेतकरी, उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी गौरव सोहळयात पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, विजयराजे ढोबळे, सौ. शोभा पवार, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन द्वारा होत असलेल्या शेतकरी, उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी गौरव सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेले असून त्यांच्या कार्यामुळे समाजाला मोठा फायदा झालेला आहे. अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकाज करत असताना चाकोरी बाहेर जाऊन त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना मदत करून त्यांचे प्रश्न सोडवण्यास हातभार लावलेला आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकाचे उत्पादन चांगले घेऊन अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा सर्व मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते शेतकरी उत्कृष्ट अधिकारी व पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या वतीने त्यांच्या पत्नी सौ. शोभा पवार यांनी सत्कार स्वीकारला. मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, शेतकरी बाळासाहेब काळे, उद्योजक दत्तात्रय कोरे, संध्या खांडेकर, सीमाताई घाडगे व अन्य मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रुरल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांनी प्रस्ताविक केले व या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their legal original owners.