Pune Media
Leading the news curation and publishing for the people of Pune

सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ६ महिने पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा

सातारा दि. 06 (जि.मा.का) :- शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे रुग्ण हे सर्वसामान्य परिस्थितीतील असतात. त्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून, नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती आपल्या जिल्ह्यात होवू नये, यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. प्रत्येक शासकीय रुग्णालयात सहा महिने पुरेल इतका औषधसाठा उपलब्ध ठेवावा. जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये अशा सर्व शासकीय रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री, वैद्यकीय उपकरणे यांच्यासाठी आदर्श प्रणाली जिल्हा प्रशासनाने तयार करावी. रुग्णालयांनी त्या प्रणालीनुसार मागणी करावी. त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

सातारा येथील स्व. क्रातींसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय या ठिकाणी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसर, अतिदक्षता विभाग, मेडिकल स्टोअर्स आदी सर्व ठिकाणी भेटी दिल्या. मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध असणारा औषधसाठा यांचीही माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज कर्पे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.   रुग्णालय भेटीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी आढावा घेण्यात आला.

पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्यक्ष किती औषधसाठा उपलब्ध आहे याची चौकशी केली असता दोन महिने पुरेल एवढा औषधसाठा जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुगणालये व ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले, यावर पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी औषध खरेदीसाठी 11 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून स्थानिक स्तरावर औषध खरेदीला परवानगीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे लघु मुदतीच्या निविदा प्रक्रिया तात्काळ राबवून 6 महिने पुरतील एवढा औषधसाठा सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध ठेवावा, असे निर्देशित केले.

पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, ई औषधी प्रणालीमध्ये सर्व रुग्णालयांनी औषध साठ्यासंबंधी माहिती अद्ययावत ठेवावी. सहा महिन्यापेक्षा कमी साठा असणा-या औषधांची तात्काळ मागणी करावी, ती त्वरीत उपलब्ध करुन देण्यात येईल. आवश्यक साधनसामग्री, वैद्यकीय उपकरणे व जुनी असलेली उपकरणे यांच्यातील गॅप ॲनॅलिसीस करुन आधुनिक सामग्री उपकरणांची मागणी नोंदवावी. शासकीय आरोग्य यंत्रणा अद्ययावत व कार्यक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आदर्श प्रणाली तयार करावी, त्या प्रणाली मध्येच रुग्णालयांनी साधनसामग्री, वैद्यकीय उपकरणे यांची मागणी करावी, त्यांना ती त्वरीत उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

सर्व निवासी वैद्यकीय अधिका-यांनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी थांबणे गरजेचे असून जिल्हाधिकारी यांची यंत्रणा वेळोवेळी रुग्णालयांना भेटी देवून याबाबतची तपासणी करेल. कामाच्या वेळेत कामाच्या जागी गैरहजर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून तेथील ड्रेनेज व्यवस्था पूर्णत: तुंबली आहे. ही ड्रेनेज व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एक महिन्यात या कामाला सुरूवात होईल. ग्रामीण रुगणालयांवर नियंत्रण करुन त्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी प्रांत अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. यावेळी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचेही निर्देश दिले.
या बैठकीत ई सुश्रुत प्रणालीची माहिती देण्यात आली, ही प्रणाली अत्यंत उपयुक्त असून रुग्ण प्रवेश, औषध साठा, रुग्णांना देण्यात आलेली औषधी, याबाबतची सर्व इत्यंभूत माहिती या प्रणालीवर उपलब्ध असणार आहे. ही प्रणाली शासनाने तयार केली असून सर्व शासकीय आरोग्य यंत्रणांनी आजपासूनच ती अमलात आणावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या. यावेळी त्यांनी पहिल्या टप्प्यात 49 प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यात येणार आहेत, त्यासाठी सुमारे 40 कोटींच्या निधींची आवश्यकता असून तो विविध लेखाशिर्षातून उपलब्ध करुन देण्यात यावा, यासाठी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे मागणी केली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी आठवड्याभरात सर्व वैद्यकीय अधिका-यांची रिक्त पदे भरण्यात येणार असून यंत्रणेने प्रामाणिकपणे काम केल्यास आपण अधिक चांगल्या पध्दतीने सेवा देवू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.

000Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their legal original owners.

Aggregated From – Team DGIPR
Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More