Our Terms & Conditions | Our Privacy Policy
सोलापूरच्या विकासाला चालना
राज्य शासनाकडून गेल्या वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध निर्णयांतून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळतांना दिसत आहे. यातून दुष्काळी जिल्हा अशी ओळख पुसून कृषि क्षेत्राला बळ, धार्मिक पर्यटनस्थळांना नवा चेहरा, चौपदरी रस्त्यांचे जाळे अशी नवी वैशिष्ट्ये निर्माण होण्यास मदत होणार आहे.
यामध्ये मुंबई ते सोलापूर शहरांदरम्यान धावणाऱ्या नवव्या वंदे भारत एक्स्प्रेसचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तसेच, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र श्री अन्न अभियानासाठी २०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, सोलापूर येथे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. फलटण-पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून या माध्यमातून परिसरातील रेल्वे जाळे सक्षम होणार आहे.
पंढरपूर व अक्कलकोट या धार्मिक पर्यटनस्थळांना विशेष मानाचे स्थान असून, दोन्हींच्या विकासासाठी राज्य शासनाने आनंददायी निर्णय घेतले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत राज्य शिखर समितीच्या बैठकीत 73 कोटी 80 लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि 368 कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. यातून सोलापूरच्या धार्मिक पर्यटनाची ओळख असलेली दोन्ही तीर्थक्षेत्रे अधिक सोयीसुविधा युक्त होतील.
आषाढी वारींतर्गत श्री क्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी 5 हजार विशेष बसेस सोय करण्यात आली आहे. पंढरपूरमधील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी तातडीने 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच वारी कालावधीत पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात आली आहे. यामुळे वारकरी भाविकांची अधिकची सोय होणार आहे.
जिल्ह्याची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू असून, जिल्हा नियोजन समितीमार्फत योग्य नियोजनाद्वारे जिल्ह्याच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’या अभियानातून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दुप्पट म्हणजे दीड लाख लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तालुकानिहाय महाशिबिरातून आतापर्यंत १,२३,२१२ लाभार्थींना लाभाचे वितरण करण्यात आले असून याबाबत लाभार्थींच्याही सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री सचिवालय क्षेत्रीय कार्यालय कक्ष जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला असून, या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या अडचणींचे निराकरण स्थानिक स्तरावर होत आहे.
बळीराजाला बळ देण्यासाठी कृषि विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. कृषि क्षेत्रामध्ये जिल्ह्याने भरीव कामगिरी केली आहे. सध्या जिल्ह्यातील करमाळा, माढा, पंढरपूर, माळशिरस, मोहोळ या तालुक्यातून शेतकरी निर्यातक्षम केळी उत्पादित करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कंदर हे गाव केळीचे हब बनलेले आहे. मंगळवेढ्याची ज्वारी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रचार व प्रसिद्धीचे कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये तृणधान्यांचा आहारामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच परिणाम म्हणून बाजारामध्ये ज्वारीची मागणी व दर वाढून शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होत आहे.
कृषि विजेचा सर्वाधिक वापर असणाऱ्या पहिल्या तीन जिल्ह्यात सोलापूरचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आहे. या योजनेतून शेती पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी उपकेंद्रनिहाय जागा मागणी करून प्रकल्प उभे करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
विहित मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेतून 1 एप्रिल 2022 ते 2 जून 2023 या कालावधीत एकूण 63 हजार 503 शेतकरी लाभार्थींना 14.48 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेतून योजना सुरू झाल्यापासून दि १३ जूनपर्यंत जिल्ह्यात 163 कोटी 94 लाख रूपये लाभ वितरित करण्यात आला आहे.
दिनांक १ फेब्रुवारी ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
सन 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त तसेच गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाने प्रतिकार्ड 100 रुपयांत 4 शिधा जिन्नस संच स्वरूपात आनंदाचा शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत दिवाळी सणानिमित्त जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेतील ५२ हजार, ९२३ कार्डधारकांना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील ३ लाख, ४३ हजार, ८३४ कार्डधारकांना अशा एकूण ३ लाख, ९६ हजार, ७५७ कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले आहे. तर गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेतील 48 हजार 582 कार्डधारकांना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील 3 लाख, 21 हजार, 839 कार्डधारकांना अशा एकूण 3 लाख 70 हजार, 421 कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. सोलापूर शहरामध्ये 1,14,704 किटस् वितरित करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेतून जिल्ह्यात 1 मेपासून नऊ नागरी आरोग्य केंद्रे कार्यान्वित असून, या केंद्रांमध्ये आतापर्यंत 6988 रूग्णांची तपासणी करण्यात आली असून 1254 विनामूल्य वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच गरोदर माता व प्रसुतिपश्चात तपासण्यांची संख्या 244 आहे. यातून जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या आरोग्याची जपणूक होण्यास मदत होणार आहे.
राज्य शासनाच्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील लाखो महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८ वर्षावरील १२७०२३१ महिलांची, वैद्यकीय अधिकाऱ्याकडून १०४१७८ गरोदर मातांची, स्त्री रोग तज्ञ मार्फत ३३२७७ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. तर १०७८५ गरोदर मातांची सोनोग्राफी करण्यात आली. ३० वर्षावरील ५४९७५७ महिलांची तर ६० वर्षावरील ५०८७७ महिलांची नेत्रतपासणी करण्यात आली.
राज्यभरात ७ एप्रिलपासून अवयवदान जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत ८ शासकीय कार्यालयांमध्ये ५०० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात दर बुधवारी करण्यात येणाऱ्या स्तन कर्करोग मोफत तपासणीमध्ये आतापर्यंत 510 महिलांची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात विविध योजनांमधून चौपदरी रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्याने जिल्हा महानगरांशी जोडला गेला आहे. केंद्र शासनाच्या भारतमाला परियोजना अंतर्गत सुरत-चेन्नई या प्रकल्पाची सोलापूर जिल्ह्याकरिता 153.33 कि.मी. लांबी आहे. एकूण 1180.65 हे. आर. इतके संपादन पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग (NHAI) अंतर्गत 8 रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभाग (NH-PWD) अंतर्गत 4 रस्ते व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत (MSRDC) 5 रस्ते अशा एकूण 17 रस्त्यांचे भूसंपादनाचे काम पूर्ण झालेले आहे. एकूण 3 हजार 817 कोटी रूपये इतकी नुकसान भरपाई वाटप 57 हजार 11 खातेदार यांना केली आहे. या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे.
‘मातोश्री पाणंद’ योजनेतून सोलापूर जिल्ह्यामध्ये शासनाकडून ५३६.५० कि.मी. लांबीचे एकूण ४७९ रस्ते मंजूर झाले आहेत. जानेवारी २०२३ पुर्वी ५५१ कामे व फेब्रुवारी, मार्च २०२३ अखेर १८५ कामे अशी एकूण ७३६ कामे मंजूर करण्यात आली आहेत.
पोलीस दल सक्षमीकरणांतर्गत जिल्हा विकास यंत्रणेच्या माध्यमातून शहर पोलीस आयुक्त कार्यालयासाठी 9 चारचाकी व 4 दुचाकी तसेच ग्रामीण पोलीस दलास 12 चारचाकी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, शहर पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील 73 चालक पोलीस शिपाई, एस. टी. प्रवर्गाच्या 98 पोलीस शिपाई पदांची तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस दल आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 28 चालक पोलीस शिपाई, 26 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
सोलापूर शहरात आर्थिक दुर्बल घटकातील असंघटित कामगारांसाठी रेनगर येथे 30 हजार सदनिकांचा गृहप्रकल्प सुरू केलेला आहे. या गृहप्रकल्पात पहिल्या टप्प्यात 10 हजार सदनिकांचे काम पूर्ण झाले असून, लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यातील 5 हजार सदनिकांचे काम हाती घेण्यात आले आहे. नुकतेच लोकार्पण झालेली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची देखणी इमारत प्रशस्त व सर्व सोयींनी सुसज्ज आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी जिल्ह्यातील 6 नद्यांचा जलजागर चला जाणूया नदीला अभियानातून करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, विभाग सोलापूर मार्फत मा. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या मिशन अमृत सरोवर योजनेंतर्गत एकूण 54 सरोवर बांधण्यात आले आहेत. सदर तलावातील पाण्याची उपयोग आजुबाजूच्या गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी होत आहे. तसेच सरोवरांची निर्मिती केल्यामुळे पावसाळ्यात सरोवरामध्ये पाणी साठवण होऊन त्याचा उपयोग उन्हाळ्यात होत आहे. वसुंधरा अभियानातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामपंचायतीला राज्य स्तरावर दुसरा पुरस्कार प्राप्त झाला असून एक कोटी रूपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. जलयुक्त शिवार अभियान टप्पा २ ची प्रक्रियाही सुरू आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” अंतर्गत, जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष स्थळी व ऑनलाईन पद्धतीने विविध मेळाव्यांतून हजारो उमेदवारांची निवड करण्यात आली.
सोलापूर ही संतांची भूमि आहे. वारकऱ्यांचा मेळा भरणारी पंढरीची भूमि आहे. राज्य शासनाच्या कल्याणकारी निर्णयांमुळे सोलापूर जिल्ह्याच्या वैभवात भर पडून सोलापूर जिल्हा कृषि, आरोग्य, पर्यटन, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती करत विकासाच्या दिशेने अधिक वेगवान वाटचाल करेल.
00000
संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय,
सोलापूर
Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their legal original owners.